सातारा : चिंचणी जि. सातारा येथील बहात्तर वर्षीय अशिक्षित बबई मस्कर या आजीच्या छायाचित्राला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.
जागतिक साक्षरता दिनी ८ सप्टेंबर रोजी बबई आजी चिंचणीच्या साक्षरता वर्गात पहिल्यांदाच गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाटीवर काही अंक व अक्षरे उमटवली होती. आपल्याला लिहिता आल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील अद्वितीय आनंद मोहन जगताप यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला होता. त्यांचे हे छायाचित्र राज्यभर व्हायरल झाले होते. शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी ते केंद्रास पाठवले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण सचिव संजय कुमार यांनी ट्विट करून या छायाचित्राची प्रशंसा केली होती. नुकत्याच दिल्ली येथे सहा व सात फेब्रुवारी रोजी झालेल्या अक्षरांच्या राष्ट्रीय मेळाव्याच्या समारोप प्रसंगी केंद्रीय सचिव संजय कुमार यांनी हे छायाचित्र सर्वांना दाखवून असाक्षरांच्या चेहऱ्यावर याप्रमाणे हसू येऊ द्यात असे आवाहन केले आहे. रत्नागिरी येथील अनन्या चव्हाण या दहावीत शिकणाऱ्या स्वयंसेवक विद्यार्थिनीने बबई आजीचे छायाचित्रावरून तयार केलेले कॅनव्हास पेंटिंग आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कॉरिडॉर मध्ये सन्मानाने लावण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील तीन कलाकृतींची दखल शिक्षण मंत्रालयाने घेतली होती. त्यात बबई मस्कर आजीच्या छायाचित्राबरोबरच बारामती येथील मणक्याच्या आजाराने त्रस्त असताना शिक्षण घेणाऱ्या ७२ वर्षीय सुशीला व त्यांना शिकवणारी अन् गायनातून साक्षरतेचा प्रचार करणारी त्यांची नऊ वर्षीय नात रुचिता क्षीरसागर या आजी नातीचे छायाचित्र आणि नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सार दर्शविणारे अनन्या चव्हाण हिने काढलेले पेंटिंग यांचा समावेश आहे. या तीनही कलाकृती उल्लास मेळाव्यात केंद्र शासनास भेट देण्यात आल्या आहेत.
योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनीही या तिन्ही कलाकृतींचे कौतुक करून राज्यभरातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी होऊन साक्षर व्हावे असे आवाहन केले आहे.