सातारा : सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांना पुन्हा एकदा सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.रंजना गगे यांनी दि. ७ जुलै रोजी पालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सुत्रे आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या कामाची चुणूक दाखविण्यास सुरूवात केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या गुरुवार पेठ व लक्ष्मीटेकडी परिसरात रॅपिड अॅँटीजेन टेस्ट मोहीम राबविली. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही.
पालिकेच्या कारभाराला शिस्त लागत असतानाच रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजीत बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी पालिकेला प्राप्त झाले.गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू होती. यासाठी काही नगरसेवकांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात होते. या चर्चेला मंगळवारी पूर्णविराम मिळाला. मुख्याधिकारी गगे यांच्या बदलीमागे सत्ताधारी नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अभिजित बापट बुधवार दि. १२ रोजी पदभार स्वीकारणार आहेत.काम करण्याची दुसऱ्यांदा संधीअभिजित बापट यांनी २०१२ ते १६ या चार वर्षांच्या कालावधीत साताऱ्यात नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. यानंतर तीन वर्ष सातारा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सेवा केली आहे. सातारा विकास आघाडीच्या पसंतीचे मुख्याधिकारी साताऱ्यात आल्याने पालिका वतुर्ळात पुन्हा एकदा राजकीय वर्दळ सुरू झाली आहे.