सातारा : येथील प्रतापसिंहनगरमधील लल्लन जाधवच्या टोळीतील फरारी आरोपी नीलेश प्रकाश तापकिरे (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याला उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने प्रतापसिंहनगर येथे पकडले. लल्लन जाधव टोळीला मोक्का लागला असून नीलेश तापकिरे हा मोक्क्यातील आरोपी आहे.दरम्यान, लल्लन जाधव याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, या टोळीतील अद्याप तीनजण फरारी आहेत.लल्लन जाधवच्या टोळीवर लुटमार, मारामारी, चोरी, खंडणी आदी विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांना वारंवार समज देऊनही या टोळीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे या टोळीला तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्का लावला होता.
या टोळीचा प्रमुख लल्लन जाधव व त्याच्या टोळीने १५ फेबुवारी २०१९ रोजी दारू पिण्यास पैसे दिले नाहीत या कारणावरून कोडोली येथे दत्ता उदागे यांना जबरदस्त मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी दत्ता उदागे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
याप्रकरणी लल्लन जाधव याला मोक्कांतर्गत पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली होती. त्याच्या टोळीतील अन्य चार आरोपी फरारी होते. त्यापैकी नीलेश तापकिरे हा प्रतापसिंहनगर येथील घरी आल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन तापकिरेला अटक केली.उपविभागीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे, अनिल स्वामी, धीरज कुंभार, संतोष भिसे, सुनील भोसले, शिवाजी भिसे, पंकज ढाणे, मुनीर यांनी ही कारवाई केली.