सातारा : निवडणूक झाल्यानंतर बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. अनेक नवीन सदस्यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले तर जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याला तितकीच सार्थ अशी उत्तरे दिली. यावेळी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. शिक्षकांच्या बदलीसाठी राज्य शासनाने शाळांसाठी लागू केलेला ‘सुगम-दुर्गम’ हा निकष चुकीचा आहे. या निकषामुळे सर्वच शाळांवर अन्याय होत आहे. या निकषाला सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आक्रमक होऊन तीव्र विरोध केला. हा निकष रद्द करावा, अशी मागणीही काही सदस्यांनी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम बिनविरोधपणे पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी मंजूर केलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यावेळी विषय पत्रिकेवरील चार विषय व ऐनवेळच्या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या विरोधालाही आज धार नसल्याने सभा खेळीमेळीत पार पडली. सुरेंद्र गुदगे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतानाही आपण उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करत नाही. व्यवसाय करातही अधिकारी वाढ करीत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होत नाही. शासनाकडून त्रिशंकू भागाच्या विकासासाठी निधी येतो. तो निधी किती आला याचा उल्लेख या अर्थसंकल्पात केला नाही. तसेच जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना घरे बांधण्यासाठी पूर्वी कर्जे दिली होती. त्या कर्जाची रक्कम किती व किती वसुली झाली याचा लेखा-जोगा अधिकाऱ्यांनी सादर करावा. पशुवैद्यकीय दवाखान्यांना एक्सरे मशीन वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र, टेक्निशियन नसल्याने त्या मशीन धूळखात पडून आहेत. महिला समपुदेश केंद्राला अनुदान वाढवून द्यावे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अवजारे वाटप केली जातात. वाटप करण्यात येणारे साहित्य हे आधुनिक पद्धतीचे वाटप करण्यात यावे.’ भाजपचे दीपक पवार म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा आहेत. मात्र, त्या विकसित केल्या जात नाहीत. सातारा शहरातील प्रतापसिंह शेती फार्ममधील जागा कवडी मोल दराने विकली गेली. पोवई नाक्यावर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत सभापती निवास आहे. या सभापती निवासाची जागा विकसित केली तर कोट्यवधी रुपयांचे भाडे जिल्हा परिषदेला मिळेल. तसेच जिल्हा परिषदेच्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. ज्यांना हे मैदान भाडेतत्त्वावर दिले जाते ते मैदानाची साफसफाई करीत नसल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे.’ काँग्रेसचे भीमराव पाटील म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून या विषयावर सभागृहात केवळ चर्चा होत आहे. संजीवराजे आता तुमच्या कारकिर्दीत तरी ही जागा विकसित करून या ठिकाणी सभापती निवास उभारण्यात यावे.’मानसिंगराव जगदाळे यांनी तळबीड, मसूर, उंब्रज या पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधनावर उपचार करता येत नाहीत, असे सांगितले. शासनाच्या सुगम-दुर्गम हा निकष शाळांसाठी लागू करण्यात आला आहे. शासनाच्या या निकषावरून सदस्य आक्रमक झाले होते. प्रत्येक सदस्य आपल्या तालुक्यावर अन्याय झाल्याचे पटवून देत होते. काही शाळांना रस्ते नाहीत तर काही शाळा डोंगरावर आहेत. अशा शाळांचा समावेश दुर्गममध्ये केला नाही. जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी शिक्षकांच्या बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या सुगम-दुर्गम या निकषाला विरोध केला. हा निकष रद्द करावा, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. दरम्यान, सर्व सदस्यांनी केलेल्या सूचना ऐकून अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘निवडणूक काळात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर केलेले बजेट आहे. यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्या पुरवणी बजेटमध्ये पूर्ण केल्या जातील. ज्या विभागात उणिवा राहून गेल्या आहेत. त्या उणिवा कमिट्या पूर्ण झाल्यानंतर भरून काढल्या जातील.’ जिल्हा परिषद महापुरुषांच्या आणि लोकनेत्यांची जयंती साजरी करत असते. याला विरोध नाही. मात्र, जयंती साजरी करीत असताना लोकनेत्यांच्या जयंतींना लाखो रुपयांची तरतूद आणि आणि महापुरुषांच्या जयंतीसाठी केवळ काही हजारांची तरतूद हे कदापिही चालू देणार नाही. असा दुजाभाव जिल्हा परिषदेकडून होणार असेल तर आंदोलने होतील, असा इशारा सदस्या रेश्मा शिंदे यांनी दिला. यावर संजीवराजे यांनी सुधारित अंदाजपत्रकात महापुरुषांच्या जयंतीसाठी अधिक तरतूद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सातारा जिल्हा परिषदेच्या या सभेत अनेक विषयांवर उहापोह झाला. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले. (प्रतिनिधी)
‘सुगम-दुर्गम’वर सत्ताधारी-विरोधक आक्रमक
By admin | Published: April 19, 2017 10:59 PM