कोरेगाव : लॉकडाऊननंतर बाजारपेठ खुली होण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासन-आरोग्य विभाग आणि शहरातील समाजसेवी संस्थांच्या पुढाकाराने बुधवारपासून व्यापारी-उद्योजकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. दिवसभरात १४७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरेगाव शहरातील आठ तर पुसेगाव येथील एकाचा त्यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी शहरातील व्यापारी-उद्योजकांची अँटिजन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. हुतात्मा स्मारक येथे सकाळपासून तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था सोनेरी ग्रुप व आम्ही कोरेगावकर ऑक्सिग्रुपचे सदस्य-पदाधिकाऱ्यांनी तपासणी शिबिराची तयारी केली होती.
दिवसभरात १४७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरेगाव शहरातील आठ तर पुसेगाव येथील एकाचा त्यात समावेश आहे. दररोज २०० अँटिजन तपासण्याचे नियोजन असून, ज्या औषध विक्रेत्यांची तपासणी झालेली नाही, त्यांनी स्वत: व त्यांच्या कर्मचाऱ्यांची तातडीने तपासणी करून घ्यावी, तोपर्यंत दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन तपासणी शिबिराचे समन्वयक तलाठी शंकरराव काटकर व सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी केले आहे.
चौकट :
कोरेगावकरांचा पुढाकार...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून प्रशासन फ्रंटलाईनवर काम करत असून, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये भरीव योगदान देत आहेत. गतवर्षी हुतात्मा स्मारक येथे रक्षक क्लिनिक संकल्पना राबविण्यात आली होती. त्या माध्यातून कोरोनाच्या पहिल्या लाटेत अत्यंत चांगले काम झाले होते. दुसऱ्या लाटेच्यावेळी अँटिजेन तपासणी व रक्तदान शिबिरांद्वारे चांगले काम सुरू आहे. एकूणच कोरेगावात प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था हातात हात घालून काम करत आहेत. सातारा जिल्ह्यासाठी तो आदर्श ठरत आहे.