जिल्ह्यात वाढता उन्हाळा व उष्णतेची तीव्रता पाहता, माणूस आपली तहान भागविण्यासाठी नानाविध समस्यांना सामोरे जाऊन प्रयत्नशील आहे; परंतु मुक्या पशु-पक्ष्यांचं काय? त्यांना आपली तहान भागविण्यासाठी मर्यादा पडत असून, सध्या वाढत्या उन्हाच्या झळा, त्यात ठिकठिकाणी आटलेले झरे, पाणवठे पाहता, या रखरखत्या उन्हात पशु-पक्ष्यांची एका थेंबाच्या पाण्यासाठी होणारी व्याकुळता ओळखून आपण आपली माणुसकी जपणं आवश्यक आहे.
दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाण्याचा प्रश्न भेडसावू लागतो. ठिकठिकाणी उन्हाच्या बाष्पिभवनाने तलाव कोरडे पडतात. झरे, पाणवठे आटून जातात. बोअरवेल, विहिरींचेही पाणी कमी होऊ लागते. दरम्यान. माणूस पर्याय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घेऊ शकतो. परंतु पशु-पक्ष्यांचं काय? त्यांना आपली तहान भागवत असताना मर्यादा पडतात. ना कुठली स्कीम, ना कुठली योजना. दरम्यान, आपल्यातील माणुसकी जागी करून प्राणीमात्रांविषयी भूतदया या मूल्यांची जाणीव केवळ पुस्तकात वाचनापुरती मर्यादित ना? ठेवता सद्यस्थितीत वेळ आली आहे, ती प्रत्यक्षात कृती करण्याची. अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, प्राणीमित्र, पक्षीमित्र आपापल्यापरीने या मुक्या पशु-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी सतत धडपडत असतात. कोणी या पशुंच्या मुखात तसेच पक्ष्यांच्या चोचीत पाणी पोहोचेल, यासाठी काहीना काही उपाययोजना करताना पाहायला मिळतात. एखादा जीव जगण्यासाठी त्याला पाण्याची आवश्यकता असते. जसं मनुष्याला जगण्यासाठी पाणी अनमोल आहे, तसं प्राणीमात्रांनासुध्दा! कारण तो पण एक जीवच आहे ना? ठिकठिकाणच्या परिसरात पाहायला मिळतं; कोणी झाडाच्या फाद्यांवर, तर कोणी घराच्या छतावर, तर कोणी आपल्या अंगणातल्या परिसरात तसेच झाडा-झुडपांच्या जंगल परिसरात पाण्याची भांडी ठेवून त्यात नित्यनियमाने पाणी ठेवतात. शहराचा विचार केला, तर कोणी गॅलरीत, पोर्चवर पाण्याचे भांडे ठेवतात. काहीजण तर जमिनीत कृत्रिम पाणवठे करून कित्येक मैल दूरवरून पाणी आणून ओततात. यामागे त्यांची भावना निर्मळ आहे, ती म्हणजे पाण्याविना आपल्या घशाला जशी कोरड पडून जीव कासावीस होतो, तसाच या पशु-पक्ष्यांच्याबाबतीत देखील होत असावा. पाण्याचा प्रश्न केवळ चार महिन्यांचा आहे. एखादया झाडावर पक्षी असेल तरच ते झाड शोभून दिसते; तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्राणीसंपदा पाण्याअभावी वणवण ना? फिरता; पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासात बदल होऊ नये, प्राणीसंपदा टिकून राहण्यासाठी आपणा सर्वांच्या प्रयत्नातून पशु-पक्ष्यांच्या पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. कित्येक घरगुती कारणास्तव आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो; परंतु त्यातील एक घोट या जिवांचा प्राण वाचविणार असल्याने हे आपणाला विसरून कसे चालेल. यासाठी बेजबाबदार ना? राहता पशु-पक्ष्यांच्या पाणी व्यवस्थापनासाठी आपण सर्वानी पुढं आलं पाहिजे.
(चौकट )
कृतिशील संदेश मौलिक....
कडक उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाईमुळे मुक्या जिवांचे खूपच हाल होत आहेत. हे हाल टाळण्यासाठी पशु-पक्ष्यांसाठी हातात नको आता काठी; अंगणात ठेवू पाण्याची वाटी! दिलेला हा भूतदयेचा, प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा हा कृतिशील संदेश फारच मौलिक आहे.
(चौकट)
पक्ष्यांसाठी घराबाहेर भांडे ठेवा..
पाण्याच्या कमतरतेमुळे पशुपक्षी नागरी वस्तीकडे वावरताना दिसतात. सर्वत्र सिमेंटची जंगले पाहायला मिळत आहेत. पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी घराबाहेर भांडे ठेवा, असा सोशल मीडियावर संदेश पाठवणाराच किती आपल्या घरासमोर पाणी ठेवतो, ही शोकांतिका असून, नुसत्या वावड्या करण्यापेक्षा प्रत्यक्ष आचरणाला प्राधान्य द्यावे. एक हाक मुक्या जिवांची तहान भागविण्याची असून, आपल्या या छोट्याशा प्रयत्नांतून त्यांच्या पखांना बळ येणार आहे.