महाबळेश्वर : ऑनलाइन व्यवहार करतानाची निष्काळजी एका जोडप्याला चांगलीच महागात पडली. संक्रांतीच्या दिवशी एकाने बस आरक्षणाच्या बहाण्याने जोडप्याला ऑनलाइनवरून तब्बल ५८ हजार २०० रुपयांना गंडा घातला. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, मेटगुताड येथील कल्पेश मंगलदास बावळेकर हे नोकरीनिमित्त मुंबईला राहतात. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी ते पत्नी प्राजक्तासह गावी आले होते. पुन्हा मुंबईला जाण्यासाठी बस आरक्षण करणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी खासगी प्रवासी बसची ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या कंपनीला फोन लावला. कंपनीत फोन उचलणाऱ्या व्यक्तीने संभाषणानंतर कल्पेश यांना आपल्या ‘मोबाइलमध्ये डेक्स ॲप्लीकेशन डाउनलोड करा’, असे सांगितले. कल्पेश यांनी संबंधित बस कंपनीतील व्यक्तीने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या मोबाइलमध्ये डेक्स ॲप्लीकेशन डाउनलोड केले. या ॲप्लीकेशनमुळे कल्पेश यांच्या बँक खात्याची सर्व माहिती त्या व्यक्तीला मिळाली. त्याने कल्पेश यांच्या बँक खात्यातून बाराशे रुपये व त्यानंतर पुन्हा ५७ हजार रुपये असे एकूण ५८ हजार २00 रुपये कल्पेश यांच्या बँक खात्यातून लांबविले. याबाबत मोबाइलवर मॅसेज येताच संबंधित खासगी बस कंपनीतील व्यक्तीने गोपनिय माहिती मिळवून बँक खात्यातून रक्कम काढून फसवणूक केल्याचे बावळेकर जोडप्याच्या लक्षात आले.
कल्पेश व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन फसवणुकीबाबत सर्व माहिती सातारा येथील सायबर सेल कक्षाला दिली. सायबर सेल विभागाने ऑनलाइन चोरीचा तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी दिली.
चौकट :
अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नका
ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक बँक खातेदारांना ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. आपली माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवरून देऊ नका, असे वारंवार सांगितले जाते. काही मंडळी ऑनलाइन व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घेत नसल्याने अशा प्रकारे फसवणूक होते तरी महाबळेश्वर येथील सर्वांनी अशा चोरट्यांपासून सावधगिरी बाळगणे हाच उपाय आहे. गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन महाबळेश्वर पोलिसांनी केले आहे.