प्रमोद सुकरे
कऱ्हाड : कोरोनाची पहिली लाट ओसरतेय ना ओसरतेय तोच दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. पण पहिल्या लाटेतून आम्ही काय शिकलो? दुसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याबाबत काय उपाययोजना केल्या? याचा आढावा घेतला तर राज्यकर्त्यांची अनास्था बाधितांच्या मुळावर उठली आहे असेच म्हणावे लागेल.
कऱ्हाड हे जसे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, त्याच पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रातही कऱ्हाडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक मोठमोठी हॉस्पिटल येथे आरोग्य सेवा देत आहेत. त्याला साजेसे कऱ्हाडचे शासकीय रुग्णालय असावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रुग्णालयाला भरीव निधी दिला. नवी इमारत उभी राहिली .वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नामकरण झाले. त्यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या रुग्णालयात ट्रामा सेंटर, सिटीस्कॅन मशिनरी, अत्याधुनिक यंत्रणा असणार अशा बऱ्याच वल्गना समारंभात नेत्यांनी केल्या; पण आज येथे फक्त इमारतच जागेवर दिसते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत उपजिल्हा रुग्णालय नाॅन कोविड कसे राहील यासाठीच नेत्यांनी ताकत लावली. शेवटी ''लोकमत''च्या पाठपुराव्याला यश आले. येथे कोरोना विभाग सुरू झाला; पण तो किती क्षमतेने सुरू आहे याचा शोध राज्यकर्त्यांनी कधी घेतलाय का? उलट पहिल्या लाटेवेळी लोकप्रतिनिधींनी कोरोना विभाग सुरू करण्याच्या उद्देशाने ताकद लावली असती, आवश्यक कर्मचारी, डाॅक्टर उपलब्ध करून घेतले असते; यंत्रसामग्री उपलब्ध करून घेतली असती, तर याचा उपयोग कायमस्वरूपी कऱ्हाडकरांना झाला असता; पण हे लक्षात कोण घेतो? ही परिस्थिती आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातही तीच अवस्था आहे. काशीळ येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत कित्येक वर्षे धूळ खात पडून आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा २७ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी चव्हाण यांनी स्वतः ट्विट करून, ''या रुग्णालयाला सात वर्षांपूर्वी मीच मंजुरी दिली होती, आता हे रुग्णालय सात दिवसांत सुरू होईल'' असे म्हटले होते. आज या गोष्टीला नऊ महिने लोटले तरी अजून मुहूर्त लागलेला दिसत नाही. याला राज्यकर्त्यांची अनास्था नाही तर काय म्हणायचं? पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मतदार संघातील हे ग्रामीण रुग्णालय आज प्रत्यक्ष सुरू असते तर निश्चितच कोरोना बाधितांना फायदा झाला असता.
पहिल्या लाटेवेळी उशिरा का होईना लोकप्रतिनिधींनी कोरोना हॉस्पिटल सुरू केली. ती किती दिवस चालली? रुग्णाला त्याचा किती फायदा झाला? हा संशोधनाचा भाग आहे; पण पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक असताना लोकप्रतिनिधी फक्त आढावा बैठका घेऊन सर्व कार्यवाही अधिकार्यांवर सोडून देणार असतील तर ही बाब गंभीरच म्हणावी लागेल. खरंतर प्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून लोकांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात; पण ते करताना फारसे कोणीच दिसत नाही.
चौकट
वडगाव- उंडाळेचा कोरोना विभाग कधी सुरू होणार..
वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना उपचार विभाग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने आढावा बैठकीत घेतला आहे. खरं तर याला बरेच दिवस उलटून गेले आहेत; पण अजूनही काम सुरू आहे एवढीच त्रोटक माहिती प्रशासन देत आहे. मग हे कोरोना विभाग माणसं सरणावर गेल्यावर सुरू होणार आहेत का, असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे.
चौकट
ऑक्सिजन प्लांट उभा केला असता तर ...
खरंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळेसच त्याची भयानकता समोर आली होती. त्याच वेळी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा करण्याची गरज ''लोकमत ''ने व्यक्त केली होती. ते मत गांभीर्याने घेतले असते तर आज कऱ्हाडकरांना त्याचा निश्चितच फायदा झाला असता अन् आढावा बैठकीत ऑक्सिजन प्लांट उभारणीवर चर्चा करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली नसती.
चौकट
लसीकरणासाठी हेलपाटे ..
शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत लसीकरणाची घोषणा केलेली आहे; पण हे लसीकरण व्यवस्थित होतंय का हे पाहण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीच ना? पण आज ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑनलाईन नोंदणी करूनसुद्धा लोकांना लस मिळत नाही. दोन-तीन हेलपाटे मारले तरी त्यांची दाद कोणी घेत नाही. कडक निर्बंध असताना आपल्या गावातून दुसऱ्या गावातील रुग्णालयापर्यंत पोहोचणे किती कठीण आहे याची जाणीव कोणी ठेवताना दिसत नाही.
चौकट
उद्देश कधी साध्य होणार?
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कोविड हॉस्पिटल आठ दिवसांत सुरू होईल असे प्रशासनाकडून सांगून दहा दिवस लोटले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अजूनही त्याचे काम अपुरेच आहे. संबंधित हॉस्पिटल ठाणे येथील डॉक्टरांची टीम चालवणार असल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली; पण बहुउद्देशीय सभागृहातील कोरोना हॉस्पिटल सुरू होऊन उपचाराचा मुख्य उद्देश कधी साध्य होणार, हा कऱ्हाडकरांना पडलेला प्रश्नच आहे.
फोटो :पृथ्वीराज चव्हाण यांनी २७ जुलै २०२० रोजी केलेले ट्विट