फलटण : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबनच्या २०२१-२२ योजनेसाठी फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, कृषी पंप संच, वीजजोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण व सूक्ष्म सिंचन संच देण्यात येणार आहे. नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे कमीत कमी १ एकर इतके क्षेत्र असणे आवश्यक आहे, तसेच इतर बाबींचा लाभ घेण्यासाठी अर्धा एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे. या बाबींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खाते उतारा, सर्व सातबारा उतारे, सक्षम अधिकाऱ्यांचा जातीचा दाखला, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी), आधार कार्ड, बँक पासबुक, ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव, निवड झालेल्या बाबीसाठी यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहनही सभापती शिवरूपराजे खर्डेकर व गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे यांनी केले आहे.