पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या वसना व वांगना उपसा सिंचन योजनेतून २०१७-१८ रब्बी हंगामात देण्यात आलेल्या पाण्याची थकीत रक्कम ६ मार्चपूर्वी भरण्याचे आवाहन उपसा सिंचन विभागाच्या वतीने सहायक कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी केले आहे.
त्या संदर्भाची सूचना संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसींद्वारे देण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात शेतीसिंचनासाठी वसना उपसा सिंचन योजना अधिक फलदायी ठरत आहे. गत तीन वर्षांपासून कार्यान्वित
झालेल्या वसना उपसा सिंचन योजनेतून मागणीनुसार सिंचनासाठी सिंचनदराने पाणी सोडले जाते; परंतु संबंधित पाण्याची सन २०१७-१८ वर्षातील जवळपास ३३ लाख रुपये थकबाकी असून, संबंधित थकबाकी संबंधितांनी सहा मार्चपूर्वी जमा करावी, असे आवाहन उपसा सिंचन उपविभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, उपविभागाकडून वारंवार सूचना करूनही संबंधितांकडून पैसे देण्यास विलंब केला जात आहे. ही बाब विचारात घेऊन उपविभागाने थकबाकी जमा करण्यास ६ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत थकबाकीची रक्कम जमा न केल्यास पाटबंधारे अधिनियम १९७६ चे तरतुदीनुसार थकबाकी रकमेचा बोजा सातबाऱ्यावर चढवण्यात येणार आहे. तसेच त्याची वसुली स्थावर मालमत्तेत करण्याचे प्रस्तावित आहे.
(कोट)
संबंधित वसुलीबाबत संबंधितांना यापूर्वीही पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीद्वारे
वारंवार सूचना केल्या आहेत. आगामी काळात योजनेतून पाण्याचा लाभ
मिळविण्यासाठी संबंधितांनी थकबाकी रक्कम जमा करून सहकार्य करावे.
-नितीश पोतदार,
सहायक कार्यकारी अभियंता