सातारा : वारंवार सूचना करूनही बहुतांश नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. त्यामुळे सोमवारी सातारा पालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत ध्वनीक्षेपकावरुन आवाहन करण्यात आले. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, प्रारंभी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरात फिरत्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने मंडई, राजवाडा, मोती चौक, पाचशे एक पाटी, पोवई नाका, तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार तसेच वाहनचालकांना मास्क वापरण्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपकावरुन दिल्या. तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास यापुढे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही पथकाकडून देण्यात आला.