सातारा : मुख्याधिकारी शंकर गोरे हे पालिकेत न आल्यामुळे नगरसेविका लीना गोरे यांनी त्यांच्या नेमप्लेटला निवेदन अडकवून निषेध केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकर्त्यांशी शाब्दिक चकमक उडाली.मंगळवार पेठेतील डफळे हौद ते विश्वेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे, या मागणीसाठी नगरसेविका लीना गोरे यांनी बुधवारी सकाळी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, मुख्याधिकारी शंकर गोरे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे बराचवेळ लीना गोरे आपल्या पेठेतील नागरिकांसह दालनाबाहेर ठिय्या मारून बसले होते. गोरे अनुपस्थित असल्यामुळे दालनाबाहेर खुर्ची ठेवून त्यावर निवेदन ठेवण्याचाही आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना या प्रकारापासून परावृत्त केले. त्यानंतर लीना गोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नेमप्लेटला निवेदन अडकवून निषेध व्यक्त केला.निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्याच्या कामाची वर्क आॅर्डर मंजूर झाली आहे. परंतु पालिका निवडणूक लागल्याने उर्वरित काम प्रशासनाने बंद ठेवले आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पेठेतील नागरिकांनी वारंवार समक्ष भेटून सुद्धा मुख्याधिकारी शंकर गोरे काम सुरू करण्यास टाळाटाळ करत आहेत. वारंवार भेटून व सूचना देऊन सुद्धाही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना रितसर निवेदनही दिले होते. केवळ राजकारण म्हणून या रस्त्याची कामे रखडविली गेली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मुख्याधिकाऱ्यांच्या नेमप्लेटला अडकविले मागण्यांचे निवेदन
By admin | Published: March 22, 2017 10:38 PM