सातारा : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. परवानाधारकांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
याबाबत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करताना परवानाधारकांनी अनुज्ञप्ती क्रमांक, वाहन क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरणे आवश्यक आहे. एकूण ५७२९ इतके अधिकृत परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांपैकी ४ जूनअखेर १०३४ परवानाधारकांनी सादर केलेल्या अर्जांचा निपटारा करण्यात आलेला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते व मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने किंवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी पोस्ट खात्यामार्फत सातारा जिल्ह्यातील विविध पोस्ट कार्यालयांमध्ये एकूण ४८ ठिकाणी आधार संलग्न सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा परवानाधारकांनी कार्यालयास ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.