तरडगाव : तरडगावमध्ये १९६० मध्ये बांधलेल्या हायस्कूलची इमारत जीर्ण झाली होती. त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात होते. पण इतर गावांप्रमाणेच आपलीही चांगली शाळा असावी हे स्वप्न येथील विद्यार्थ्यांनी पाहिले होते. शैक्षणिक संस्था, ग्रामस्थ व कमिन्स कंपनी यांच्या संयुक्त सहभागातून तरडगाव हायस्कूल इमारत बांधण्यात येत आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला.पूर्वी झाडाखाली, मंदिरात शाळा भरत असत. कालांतराने शालेय इमारती उदयास येऊन त्यास खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिराच रूप मिळालं. पण अनेक वर्षांनी या इमारतींची झीज होऊन आता त्यांची दुरावस्था होऊ लागली आहे. याचा प्रत्यय श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण या संस्थेच्या तरडगाव येथील वेणूताई चव्हाण हायस्कूलकडे पाहिल्यावर येतो. शाळेत शिक्षण घेऊन अनेकांनी विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उमटवित गावाला चांगला नावलौकिक मिळवून दिला आहे. १९६० मध्ये लोकसहभागातून बांधलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे.नूतन इमारतीबाबत अनेक वर्षे ग्रामसभामधून चर्चा होत. पण काहीच हालचाली होत नव्हत्या. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकांमधून अखेर नूतन इमारतीबाबत सकारत्मक चर्चा घडून संस्था, कमिन्स कंपनी, ग्रामस्थ यांच्या सहभागातून सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय झाला. अन विजयादशमीच्या दिवशी भूमिपूजनही करण्यात आले.
दहावीत प्रथम आलेल्या वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनीच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी संस्थेचे गव्हर्नर कौन्सिलचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी- बेडके, माजी सभापती वसंतराव गायकवाड, मालोजीराजे बँकेचे संचालक सुभाषराव गायकवाड, हृदय कदम, प्रवीण गायकवाड, विक्रम धुमाळ, मुख्याध्यापक एस. पी. पाटील, उपस्थित होते. भोसले कुटुंबाचा सत्कारशाळेच्या बांधकामासाठी थोडी जागा कमी पडत होती. हे लक्षात आल्यावर बाळासाहेब भोसले, दत्तात्रय भोसले, सुहास भोसले, दीपक भोसले यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दान स्वरूपात दिली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पदाधिकारी, सदस्यांची अनुपस्थितीनूतन इमारतीबाबत चर्चेसाठी यापूर्वीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य हे भूमिपूजनाला मात्र अनुपस्थित राहिल्याचे दिसले.