कऱ्हाड : कऱ्हाड पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास निवडणूक विभागाने महत्त्वपूर्ण अशा सोळा विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्रांची व संबंधित विभागप्रमुखांच्या सह्यांची मागणी केल्यामुळे पहिल्या दिवशी इच्छुकांना चांगलीच धावपळ करावी लागली. सोळा विभागांतील अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शौचालय असण्याचे ना हरकत प्रमाणात असणे बंधनकारक केल्यामुळे पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे इच्छुकांना चांगलेच जड जात आहे. अर्ज भरायचा आहे साहेब...अगोदर सही द्या! अशी जो तो इच्छुक उमेदवार विभागप्रमुखांकडे मागणी करताना दिसत आहे.कऱ्हाड पालिकेत सोमवारपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासून इच्छुकांनी पालिकेत गर्दी केली होती. सोळा विविध विभागप्रमुखांच्या ना हरकतीबाबत सह्या घेतल्यानंतरच शेवटी मुख्याधिकाऱ्यांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरता येणार असल्याने इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. कोणता विभाग कुठे आहे याची माहिती नसल्यामुळे अनेकांकडून तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काय-काय करावे लागते, असे बोलले जात होते.प्रशासनाकडून निवडणूक पारदर्शक व काटेकोरपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. ठिकठिकाणी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यावर सक्षम अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तर पालिका निवडणूक लढविण्यास यावेळेस मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून निवडणुकीबाबत जनसंपर्क कक्षामार्फत इच्छुकांना कोणत्या प्रकारच्या अडचणी उद्भवल्यास त्यास योग्य ते मार्गदर्शन करण्याचे सहकार्य केले जात आहे.पालिकेत सोमवारी सकाळी अकरा वाजता पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज आॅनलाईनद्वारे भरण्यास प्रारंभ केला असता सुमारे एक तास पहिल्यांदा संबंधित इंटरनेट सर्व्हरमध्ये बिघाड आला. त्यामुळे एक तास उशिरा आॅनलाईन नोंदी भरण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे काहीवेळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता. एक तासानंतर सर्व्हर व्यवस्थित झाल्यानंतर उमेदवारांचा आॅनलाईनद्वारे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. (प्रतिनिधी)‘ना हरकती’साठी ध्वजनिधीचीही सक्ती !सध्या कऱ्हाड पालिका निवडणुकीत अर्ज भरण्याबाबत राजकीय संभ्रमावस्था असल्यामुळे कोणत्या आघाडीचा, कोणत्या पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घ्यायचा हे उमेदवारास अध्यापही माहिती नाही. मात्र, अर्ज भरण्यासाठी ध्वजनिधीची पावती मात्र उमेदवारास सक्तीने भरावी लागत आहे. असा प्रकार पालिकेतील आरोग्य विभागात पाहावयास मिळत आहे. पन्नास रुपये भरून पावती घेतल्यानंतरच इच्छुकास ना हकरतीबाबत सही दिली जात आहे.ज्याचे शौचालय नाही त्यास ना हकरत नाही !कऱ्हाड पालिका निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुकांकडून आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर इतर महत्त्वाची कागदपत्रेही जोडली जात आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे प्रमाणपत्र म्हणजे शौचालय बांधकामाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराकडे शौचालय नसेल त्यास उमेदवारी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नसल्याचे संबंधित विभागप्रमुखांनी सांगितले.इच्छुकांसाठी ६२ प्रकारची निवडणूक चिन्हे !कऱ्हाड पालिका निवडणूक कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढवायची याबाबत निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त व मुक्त अशी ६२ प्रकारची चिन्हे संबंधित पालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहेत. त्या चिन्हाची पक्षासह यादी पालिका इमारत आवारात लावण्यात आली आहे. ‘जात पडताळणी’च्या मागणीसाठी ५० स्वीकृत अर्ज प्राप्तकऱ्हाड पालिका निवडणुकीत अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गातील इच्छुक उमेदवारांकडून जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावयाचे आहे. हे सोमवारी पहिल्या दिवशी पन्नासच्या सुमारास अर्ज संबंधित विभागाकडे प्राप्त झाले आहेत. गुरुवार, दि. २० पासून संबंधित अर्ज प्राप्त होत असल्याची माहिती माहिती संबंधित विभागप्रमुख अशोक भोसले यांनी दिली. इच्छुक अर्जासाठी तर कर्मचारी बोनससाठीऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आली असल्याने निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज लवकर भरण्यात यावा म्हणून काही उमेदवारांनी पहिल्या दिवशीच पालिकेत गर्दी केली. उमेदवारी अर्जाबरोबर सोळा प्रकारच्या ना हरकत सह्या घ्याव्या लागणार असल्याने इच्छुकांनी पालिकेत गर्दी केली होती. दोनशेहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला नसल्याने मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
एक अर्ज अन् सोळा सह्या... उमेदवार बेजार !
By admin | Published: October 25, 2016 12:05 AM