ओगलेवाडी , दि. २७ : शिक्षकांच्या बदली अर्जाच्या प्रक्रियेतील गोंधळ अद्यापही सुरूच आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही संकेतस्थळ सुरू होण्यात तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे शिक्षक अक्षरश: वैतागले आहेत. अनेक शिक्षक अद्याप अर्ज भरू शकलेले नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ग्रामविकास विभागामार्फ त करण्यात येत आहे. दहा वर्षे नोकरी करत असलेल्या शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या शाळांच्या यादीतून वीस शाळांची निवड करायची आहे. मात्र, बदल्यांचे अर्ज भरण्यासाठीचे संकेतस्थळ सुरू होण्यासाठी पाच दिवसांपासून अडचणी येत आहेत.
राज्यातील जवळपास एक ते दीड लाख बदलीपात्र शिक्षकांच्या बदलीचा गोंधळ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, संकेतस्थळांची परिस्थिती जैसे थे आहे.
औरंगाबाद येथील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी २३ आणि २४ आॅक्टोबर अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत बहुतेक शिक्षक अर्ज भरू शकले नाहीत. ही मुदत एका दिवसाने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील जिल्ह्यांचे नियोजनही कोलमडणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांचे नियोजन स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.सुटीतही शिक्षक आॅनलाईनदिवाळीच्या सुटीसाठी अनेक शिक्षक सहलीसाठी सहकुटुंब बाहेर आहेत. कुटुंबासोबत सहलीचा आनंद लुटताना बदलीची माहिती घेण्यासाठी अनेक शिक्षक फोनवर वेबसाईट पाहत असून, सहलीत आनंद लुटण्यापेक्षा आॅनलाईन वेबसाईट पाहण्यातच ते गुंग असल्याचे दिसत आहे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीचा आनंद यावर्षी शिक्षकांना घेता आलेला नाही.