लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दाखल उमदेवारी अर्जांची छाननी शनिवारी झाली. यामध्ये तिघांचा अर्ज बाद झाला असून खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह २१ जणांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे. यासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. १९ एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या मुदतीपर्यंत एकूण २४ उमेदवारांनी ३३ नामनिर्देशनपत्रे सादर केली होती. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष म्हणूनही अनेकांनी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जाची छाननी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. छाननीत तिघांचा अर्ज बाद झाला. यामध्ये गणेश शिवाजी घाडगे (रा. शिबेवाडी कुंभारगाव, ता. पाटण), राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) आणि वैशाली शशिकांत शिंदे (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव) यांचा समावेश आहे. घाडगे आणि चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तर वैशाली शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला होता. छाननीत २१ उमेदवार पात्र ठरले आहेत.
छाननीत पात्र उमेदवार असे आहेत. खासदार उदयनराजे भोसले (भाजप, रा. सातारा), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्ष, रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव), आनंद थोरवडे (बहुजन समाज पार्टी, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड), प्रशांत कदम (वंचित बहुजन आघाडी, रा. वडगाव-उंब्रज, ता. कऱ्हाड), तुषार मोतलिंग (बहुजन मुक्ती पार्टी, रा. कळंबे, ता. वाई). दादासाहेब ओव्हाळ (रिपाइं-ए, रा. प्रतापसिंहनगर, सातारा), दिलीप बर्गे (भारतीय जवान किसान पार्टी, रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा), सयाजी वाघमारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, रा. तळबीड, ता. कऱ्हाड). हे राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. तर डाॅ. अभिजित बिचुकले (रा. गुरूवार पेठ, सातारा), सुरेशराव कोरडे (रा. शहाबाग, वाई), संजय गाडे (रा. कुसुंबी, ता. जावळी), चंद्रकांत कांबळे (रा. गोडोली, सातारा), निवृत्ती शिंदे (रा. शाहूनगर, सातारा), प्रतिभा शेलार (रा. सोमवार पेठ, सातारा), सदाशिव बागल (रा. गोवे, ता. सातारा), मारुती जानकर (रा. केसकर काॅलनी, सातारा), विठ्ठल कदम (रा. वयगाव, ता. वाई), विश्वजित पाटील-उंडाळकर (रा. उंडाळे, ता. कऱ्हाड), सचिन महाजन (रा. बुध, ता. खटाव), सागर भिसे (रा. सदरबझार सातारा) आणि सीमा पोतदार (रा. पुसेसावळी, ता. खटाव) या अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे.
राजकीय पक्षांचे आठ; तर अपक्ष १३ जणांचे अर्ज वैध... सातारा लोकसभा निवडणुकीसाठी छाननी पात्र ठरलेल्या उमेदवारांत विविध राजकीय पक्षांचे आठजण आहेत. तर अपक्ष १३ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये रमेश थोरवडे, उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत. आता दि. २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.