वाठार स्टेशन : ‘देऊर विकास सोसायटीत झालेला कोट्यवधीचा घोटाळा मिटविण्यासाठी सभासदाच्या नावावर १० हजार रुपयांचे कर्ज टाकण्यात आले. या कर्जप्रकरणावर सही केली तरच शासनाच्या कर्जमाफी अर्ज भरून घेतला जात आहे,’ असा आरोप या सोयासटीचे सभासद हंबीरराव कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यात दोन ते तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या देऊर विकास सेवा सोसायटीतील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी संचालक मंडळ वेगवेगळे उपाय राबवत आहे. हा भ्रष्टाचार पूर्ण मिटला नसल्याचे उघडकीस आले आहे.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कर्ज माफी मिळवण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. याबाबत संजय उर्फ हंबीराव शामराव कदम यांनी देऊर विकास सेवा सोसायटीत सुरूअसलेली बेकायदेशीर प्रकरणे थांबवण्याबाबत वाठार पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
हंबीराव कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते १२ आॅगस्ट रोजी शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी देऊर विकास सेवा सोसायटीत गेले होते. यावेळी तेथील सोसायटी कर्मचाºयांनी ‘तुम्हाला आॅनलाईन फॉर्म भरता येणार नाही,’ असे सांगितले.
यावर कदम यांनी विचारणा केली असता ‘सोसायटीतील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी काही दिवसापूर्वी विशेष सभा घेतली. या सभेत सभासदांच्या नावावर कर्ज प्रकरण करण्याबाबत ठराव झाला. त्यामुळे या कर्ज प्रकरणावर सही केली तरच आॅनलाईन अर्ज व पीआयडी नंबर मिळेल,’ असा खुलासा केला. तसेच कागदपत्रे देण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. सह्या करत असाल तर सहकार्य अन्यथा आणखी अडचणीत आणू अशी दमदाटी व धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे.
माझ्यासारख्या अनेक सभासदांच्या फसवणूक करुन सह्या घेण्याचे काम सोसायटीमध्ये सुरू असल्याने सर्व प्रकरणे बेकायदेशीरपणे केली जात असल्याने याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी या संजय उर्फ हंबीराव कदम यांनी केली.
देऊर विकास सेवा सोसायटीत झालेला भ्रष्टाचार मिटवण्याबाबत काही दिवसापूर्वी जिल्हा बॅकेचे संचालक नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांची सभा बोलावण्यात आली होती. त्यावेळी भ्रष्टाचारातील रक्कम तत्कालीन सचिव, बँक विकास अधिकारी, बँक कर्मचारी, आजी-माजी संचालक व सभासद यांनी एकत्रित सहकार्यातून मिटवण्याबाबत सर्वानुमते ठराव केला होता. त्यानुसार ही कर्ज प्रकरणे सुरू आहेत. ज्यांना यात अडचण असेल त्यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक केली जात नाही. सर्वांचेच अर्ज भरुन घेतले जात आहेत.
- संजय पवार,सचिव, देऊर सोसायटी.