लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : करंजे पेठेतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यात बुधवारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले. पालिकेकडून जलवाहिनीची तपासणी करताना त्यामध्ये चक्क लाकडाची फळी आढळून आली. पाणीपुरवठ्यातील मोठा अडथळा दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
करंजे येथील सय्यद कॉलनी व भागाला तालुका पोलीस स्टेशन परिसरातील टाकीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणी प्राधिकरणामार्फत दिले जाते. या भागातील जलवाहिन्या बंद झाल्याने या परिसराला कमी दाबाने पाणी येत होते. याबाबतची वारंवार कल्पना देऊनही पालिका व जीवन प्राधिकरणाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करून आपला राग व्यक्त केला.
दरम्यान, बुधवारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या भागाला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीची तपासणी सुरू केली. यावेळी एका जलवाहिनीत चक्क लाकडाची फळी आढळून आली. या फळीमुळे पाणीपुरवठ्याला मोठा अडसर निर्माण झाला होता. तो दूर झाला असून, सय्यद कॉलनीला आता पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.
फोटो : २३ जलवाहिनी