औंध : त्रिमली विहिरीमध्ये सापडलेल्या तीन ते चार दिवसांच्या मृत अर्भकाच्या खुनाचा छडा लावण्यात औंध पोलिसांना यश आले आहे. अर्भकाच्या खून प्रकरणात सहभागी असलेल्या खटाव तालुक्यातील दोन महिलांना अटक करण्यात आली असून, अनैतिक संबंधातून या अर्भकाचा खून माय-लेकीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी एका विहिरीमध्ये तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले होते. त्यावेळी त्याची आकस्मिक मृत्यू म्हणून औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार जिवंत अर्भक पाण्यात फेकून दिल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानूसार अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मागील एक महिन्यापासून सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई यांनी याबाबत सखोल तपास केला असता बुधवारी खटाव तालुक्यातील दोन महिलांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर आईने ही गोष्ट गावाला कळू नये, याची काळजी घेतली. गर्भाची वाढ सात ते आठ महिन्यांपर्यंत झाली होती. तेव्हा आईने घरगुती उपायाद्वारे मुलीचे बाळंतपण घरीच केले. त्यानंतर ते जिवंत अर्भक त्रिमली विहिरीत नेऊन टाकले. दोघींनी पोलिसांसमोर या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाइ करत आहेत. (वार्ताहर)पोटाला पिशवी बांधून अविवाहित गर्भवतीचे शिक्षणया प्रकरणातील माय-लेकीकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींपैकी एक आई असून दुसरी तिची तरुण मुलगी आहे. महाविद्यालयात जाणारी ही तरुण मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. मात्र, हा प्रकार कुणालाही कळु नये म्हणून पोटाला पिशवी बांधून ती महाविद्यालयात जात होती, असेही तपासात पुढे आले आहे.
अर्भकाला विहिरीत फेकणाऱ्या माता-कन्येला अखेर अटक
By admin | Published: December 09, 2015 11:36 PM