पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटल परिसरात उड्डाणपुलापासून ढेबेवाडी मार्गाला प्रारंभ होतो. ढेबेवाडीकडून येणारी, कृष्णा हॉस्पिटलकडून तसेच कऱ्हाड शहरातून येणारी व जाणारी अशी सर्व बाजूंची वाहने या फाट्यावर एकत्रित येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहनांची गर्दी पाहायला मिळते. या फाट्यावर दक्षिण बाजूला दुकानांची रांग आहे. त्या दुकानांच्या समोरच परवानाधारक तसेच विनापरवानाधारक वडापच्या वाहनांची गर्दी कायम असते. खासगी चारचाकी तसेच दुचाकी वाहनेही मनमानीपणे या परिसरात पार्क केली जातात. त्यामुळे या परिसरात पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना कसरत करून दुकानांकडे जावे लागते. वडापच्या जीप, ऑटोरिक्षा प्रवासी भरायचे काम तिथेच करतात. त्याचठिकाणी एसटीची प्रतीक्षा करणारे प्रवासी थांबलेले असतात. त्यांची या वाहनांमुळे अडचण होते. रस्त्यावर वडापच्या गाड्या व पलीकडून रहदारी असे चित्र याठिकाणी पहायला मिळते. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. वाहतूक पोलिसांनी या परिसरात कारवाईचा बडगा उगारून वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहे.
ढेबेवाडी फाट्यावर वडापची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:43 AM