फलटण श्रीगोंदा येथील अग्निपंख फौंडेशनने बेलवंडी (ता. श्रीगोंदा) ते सरडे (ता. फलटण) ९२ किमीची सायकल वारी करून टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या प्रवीण जाधव यांचे आई वडिलांना सलाम केला. प्रवीणचे सुवर्णपदकाचे स्वप्न साकार होण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. प्रवीण जाधव हा गावकुसाबाहेर घर असलेला एका गरीब कुटुंबातील खेळाडू आहे. प्रवीण अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला आहे. यातून प्रेरणेचे बीज तरुणाईत पेरली जावीत या भावनेने सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्षचे दत्ताजी जगताप, दादासाहेब घोडेकर, किसन वऱ्हाडे, साळवे सर, सरडेचे माजी सरपंच रामदास शेंडगे यांनी शुभेच्छा दिल्या. सायकल वारीचे लोणी व्यंकनाथ काष्टी गुंजखिळा बारामती येथे स्वागत करण्यात आले.
चौकट
राष्ट्रगीत आणि आनंदाश्रू
या दुर्लक्षित जिगरबाज खेळाडूच्या घरकुलासमोर तिरंगा ध्वजाला साक्ष ठेवत राष्ट्रगीताची धून वाजली यावेळी या माता-पित्याच्या आणि सरडेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद अविस्मरणीय होता.
कोट
कठोर परिस्थितीवर मात करून प्रवीण जाधवसारखे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी बाजी लावत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अग्निपंख फौंडेशनने श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी ऑलिम्पिक वीरांच्या मंदिरी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
ललिता बाबर,
आंतरराष्ट्रीय धावपटू
चौकट
सहभागी सायकलपटू
प्रेरणा सायकल वारीत ऋतुपर्ण साळवे, रोहित वऱ्हाडे, यशार्थ साळवे, कृष्णा साळवे हे शाळकरी मुले तसेच राजू साळवे, ज्ञानेश्वर हिवरकर, दादा घोडेकर,
बाळासाहेब खामकर, कैलास हिरवेे, संदीप खलाटे, अण्णा खामकर, विलास इधाटे, विशाल गव्हाणे, सकलेन शेख, दीपक कोद्रे, किशोर बिबे, कुमार लोखंडे, किशोर बिबे, बाळासाहेब काकडे सहभागी झाले होते.
चौकट
शुक्रवारी आष्टीची सायकल वारी
आष्टी येथील कृषिपुत्र अविनाश साबळे हा ऑलिम्पिकमध्ये ट्रीपल चेस ३ हजार मीटरमध्ये उतरला आहे. त्याला शुभेच्छा व अविनाशच्या माता-पित्यांना वंदन करण्यासाठी बेलवंडी (श्रीगोंदा) ते आष्टी सायकल वारीचे शुक्रवार दि. २९ रोजी आयोजन करण्यात आले.