वाई (जि. सातारा) : पालघर तालुक्यातील एडवन येथील एक कुटुंब शनिवारी दुपारी वाई येथे आले होते. महागणपती घाटावर गाडी लावण्यावरून झोपडपट्टीतील तरुणांशी चालकाचा वाद झाला. त्यातून त्यांच्या गाडीवर काही तरुणांनी दगडफेक केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. जितेंद्र प्रभाकर तरे, मोहन हरिचंद्र तरे, प्रतीक दिलीप तरे अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत.पालघर तालुक्यातील एडवन येथील पर्यटक कुटुंबीयांसमवेत वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन पुढे मुक्कामी मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनासाठी जात असतात. हे पर्यटक शनिवारी दुपारी वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी खासगी प्रवासी बस (क्र. एमएच ०४ जीपी ०८७६) घेऊन पोहोचले. बसचा चालक गणपती पुलावर बाजूला बस उभी करत असतानाच तेथे झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्यावरून चालकाची किरकोळ बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या झोपडपट्टीत समजली. अनेक तरुण, महिलाही गणपती पुलावर पोहोचल्या. जमावाने बसवर हल्ला चढवला. यात बसच्या काचा फोडून दगड बसमध्ये बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यावर आदळले. यामध्ये जितेंद्र प्रभाकर तरे (वय ४०), मोहन हरिचंद्र तरे (६२), प्रतीक दिलीप तरे (२१) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वाई पोलिसांनी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर काही महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गाडी लावण्यावरून वाद, वाईत पालघरच्या पर्यटकांच्या गाडीवर दगडफेक; तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:26 PM