फलटण : भारतीय सैन्य व नौदलातील बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयित आरोपीसह चार ते पाचजणांनी भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील एका घरावर सशस्त्र हल्ला करून, महिलेस व तिच्या मुलास बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले असून, याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकाश काशिनाथ डांगे (वय २५, रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण) याच्यावर फलटण, भिगवण (जि. पुणे) येथे तसेच राज्यातील विविध ठिकाणी भारतीय सैन्य व नौदलातील बोगस सैन्यभरतीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून आकाश डांगेची उचलबांगडीही करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर असताना ‘माझ्या बातम्या तू माध्यमांना पुरवतोस,’ असे म्हणत आकाश डांगेने त्याच्याच भावकीतील विजयकुमार डांगे यांना अनेकदा धमकावून मारहाण करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता, बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान स्वागत चव्हाण (रा. झिरपवाडी, ता. फलटण), सचिन चांगण (रा. सासकल, ता. फलटण), अर्जुन पिसाळ (रा. भाडळी खुर्द) यांच्यासह आकाश डांगे या चौघांनी मिळून विजयकुमार डांगे यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. यावेळी विजयकुमार डांगे हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने संशयित चौघांनी विजयकुमार डांगे यांच्या घराचा दरवाजा तोडून ‘तुझा नवरा आमच्या बातम्या पेपरला देतो,’ असे म्हणत डांगे यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी विजयकुमार डांगे यांचा मुलगा ‘आईला का मारता,’ असे म्हणत आईला वाचवित असताना, या चौघांनी त्या मुलासही गंभीर मारहाण केली. या प्रकरणाची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत व कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विजयकुमार डांगे यांच्या पत्नीस व मुलास फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर फलटण पोलिसांनी आकाश डांगेसह चौघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून याप्रकरणी हवालदार रामदास लिम्हण अधिक तपास करीत आहेत.
(चौकट)
त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या जिवावर दहशत माजविण्याचा प्रयत्न
आकाश डांगे प्रकरणात मध्यंतरी फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्याची आहे तेथे बदली केल्याने या दोन अधिकार्यांच्या जिवावर आकाश डांगे दहशत माजवत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.