रहिमतपूर : पश्चिम बंगालमधील हिंसाचार, मराठा आरक्षण निकाल व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पोलिसांच्यावतीने शहरातून सशस्त्र संचलन करण्यात आले.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर राज्यांमध्ये काही ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात काही ठिकाणी निदर्शने करून आंदोलन करण्यात आली. यासारखी परिस्थिती रहिमतपूरमध्ये होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व शांतता कायम नांदावी तसेच रहिमतपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे तसेच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तरीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावरून फिरत आहेत तसेच काही दुचाकीचालक विनाकारण ये-जा करत आहेत. जागोजागी गट करून काही युवक गप्पा मारत आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये याची जाणीव लोकांना राहावी, यासाठी पोलिसांच्यावतीने शहरातून संचलन करण्यात आले. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या नेतृत्वाखाली संचलनास प्रारंभ झाला. पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले पोलीस संचलन एस. टी. स्टँड ते गांधी चौक, रोकडेश्वर मंदिर ते भैरोबा गल्ली, बागवान टेक ते नगरपालिका, गांधी चौक ते एस. टी. स्टँड चौक ते परत पोलीस ठाणे असे सशस्त्र संचलन करण्यात आले. रहिमतपूर पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक सावंत, आठ पोलीस कर्मचारी व सोळा होमगार्ड संचलनामध्ये सहभागी झाले होते.
०५रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. (छाया : जयदीप जाधव.)