सातारा : सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली.ऋतीक जितेंद्र शिंदे (वय २०, रा. मस्केवाडा, एमएसईबी कार्यालयासमोर, गोडोली, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैन्य दलातील जवान प्रवीण अरूण भोसले (रा. अंबवडे, ता. कोरेगाव) आणि त्याचे मित्र रात्री बाहेरगावहून कारने साताऱ्यात येत होते. जरंडेश्वर नाक्यावर अचानक त्यांच्या कारचे पेट्रोल संपले. त्यामुळे सर्वजण कारमधून उतरून रस्त्यावर उभे राहिले होते. त्यावेळी वाढे फाट्याकडून दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने जवान प्रवीण भोसले याच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन केले.
या प्रकाराची माहिती भोसले याने तत्काळ शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी भोसले याच्याकडून आरोपीचे वर्णन माहित करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता ऋतीक शिंदे याने हा प्रकार केला असल्याची माहिती तपासात पुढे आली. शाहूपुरी पोलिसांनी पहाटे गोडोली येथे ऋतीक शिंदेला त्याच्या घरातून दुचाकीसह अटक केली.
शिंदे याच्यावर सातारा तालुका आणि शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ आरोपीच्या वर्णनावरून या गुन्ह्याचा छडा लावला. ऋतीक शिंदेला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस निरीक्षक मुगूट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस उपनिरीक्षक डी. बी. भोसले, कॉन्स्टेबल हसन तडवी, अमीत माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्निल कुंभार, राहुल चव्हाण, राजकुमार जाधव यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.