आनंद गाडगीळ ।मेढा : मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे बदललेले आरक्षण, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या दीपक पवार यांच्या रिक्त झाली. दरम्यान, मेढा नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी वर्चस्व असले तरीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे जावळीत ‘सैन्य राष्ट्रवादीचे अन् सेनापती भाजपचे’ हे नवे राजकीय समीकरण जिल्ह्याच्या आगामी राजकारणात महत्त्वाचे ठरणार, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
जावळी मतदारसंघ सातारा मतदारसंघात विलीन झाल्यानंतर जावळीची राजकीय समीकरणे बदलली. माजी आमदार शशिकांत शिंदे कोरेगाववासी झाले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जावळीची सूत्रे आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जावळीत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बांधलेली मोट त्यांनी पक्ष बदलला असला तरी कायम असल्याची चुणूक मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदललेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असलेले त्यांचे सैन्य मात्र सेनापतीच्या अधिपत्याखालीच असल्याचे स्पष्ट झाले.
जावळीत सत्तेच्या सारीपाटात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार उभा केला नाही. अशा प्रकारे आगामी राजकीय वाटचाल विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला बाय देत शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतील आपले सैन्य शाबूत ठेवण्याची खेळी केली आहे अन् तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीत आपले नेतृत्व मानणारे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आणत तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असलेल्या सैन्याचा सेनापती मात्र भाजपचा असल्याचे सिद्ध केले.
पोटनिवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीआधी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत लक्ष घातले. या सा-या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष वेधले होते.
दोन्ही आमदार सक्रिय होण्याची चिन्हेतर दुसरीकडे पराभवाच्या धक्क्यातून सावरत माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी काहीही झाले तरी तांत्रिकदृष्ट्या मेढा नगरपंचायतीत सत्ता राष्ट्रवादीची राहणार असल्याने या निवडणुकीकडे पाठ फिरवून राजेंना बाय दिली. एकंदरीत जावळीच्या राजकारणात दोन आजी-माजी आमदार सक्रिय होणार असल्याची जाणीव जिल्हा परिषद पोटनिवडणूक व मेढा नगरपंचायत निवडणुकीतून झाली.
राज्यात सत्तेवर अन् तालुक्यात बॅकफुटावरमेढा नगरपंचायतीत ‘दैवाने दिले; पण कर्माने नेले’ या म्हणीप्रमाणे शिवसेनेची स्थिती झाली आहे. राज्याच्या सत्तेत असलेली शिवसेना तालुक्याच्या राजकारणात बॅकफूटवर आल्याचे दिसले. अवघे तीन सदस्य असलेल्या शिवसेनेला आता सत्तेबाहेर तर राहावे लागणार आहेच; मात्र त्याचबरोबर माजी आमदार सदाशिव सपकाळ हे देखील शिवसेनेला पुन्हा एकदा तारणार काय, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
निधी उपलब्ध मात्र विकास नाहीमेढा नगरपंचायत होऊन अडीच वर्षे झाली. निधी उपलब्ध झाला; मात्र विकास झाला नाही, हे कटू सत्य आहे. जीवनावश्यक असलेल्या पिण्याचे पाणी गेल्या पाच वर्षांपासून मेढेकरांना एक दिवसाआड व फक्त अर्धा तास मिळत आहे. याचबरोबर घनकचरा प्रकल्प, बंदिस्त गटारे यासारख्या अनेक प्रश्न अद्यापही कायमस्वरुपी नसलेले मुख्याधिकारी, असे अनेक प्रश्न येत्या अडीच वर्षांत सुटणार काय ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.