वाई : पसरणी गावातील विविध मूलभूत विकासकामांना प्राधान्य देणार असून, आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून विविध रखडलेली कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्या रंजना डगळे यांनी दिली.
पसरणी येथील चर्मकार वस्तीतील अनेक वर्षांची मागणी असलेल्या गटाराचे बांधकाम व त्यावरील काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नवनिर्वाचित सरपंच हेमलता गायकवाड यांच्या हस्ते डगळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य राजेश शिंदे, संतोष डगळे, संजय कांबळे, स्वप्नील गायकवाड, आनंदा कुंभार, मारुती फाऊंडेशनचे बाळासाहेब शिर्के, राजेंद्र साळुंखे, गणेश साळुंखे, अमोल साळुंखे, अमोल महांगडे उपस्थित होते.
सरपंच हेमलता गायकवाड म्हणाल्या, ‘रंजना डगळे यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी कमी पडणारा निधी ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे.’
राजेश शिंदे म्हणाले, ‘अंदाजे ४ लाख ४६ हजार रुपयांचे हे काम असून, यामुळे घरातील सांडपाणी व ड्रेनेजच्या पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लागणार आहे. गावातील आरोग्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. कोरोना काळात हे काम रखडले होते. परंतु, त्याला आता पुन्हा नव्याने गती देण्यात आली आहे.’