दहिवडी : माण तालुक्यात दहिवडी म्हसवड व पळशीनंतर लोकसंख्येच्या बाबतीत बिदालचा नंबर लागतो. मात्र सध्या या गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणचे लोक माहिती लपवत होते, तर काही लोक एकाच घरात राहत होते. त्यानंतर आरोग्य पथकाने अशा लोकांना समजावून सांगत वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरण कक्षात पाठविले. सध्या बिदालकरांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंबर कसली आहे.
तालुक्यात नरवणेनंतर बिदाल हे कोरोनाचे हॉटस्पाॅट म्हणून ओळखले गेले आणि सर्वच प्रशासन आणि गाव खडबडून जागे झाले. एका मागे एक मृत्यू होत असताना अनेक लोकं डोळ्यासमोरून निघून जात होती. गावची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान होते. गावात १२५ पेक्षा जास्त रुग्ण ॲक्टिव्ह होत्या. गावाने विलगीकरण कक्ष उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ३ लाखांचा निधीही जमा झाला. मात्र, खरे आव्हान होते ते वेगळेच. ते म्हणजे गावातील लोकांचे विलगीकरण करणे, त्यांना औषधे, ऑक्सिजन बेडच्या सुविधा पुरवणे, त्यानंतर गावातील आजी-माजी प्रशासकीय अधिकारी, ग्रामकमिटी, डॉक्टर यांची बैठक पार पडली.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तो दिवस ठरला त्याप्रमाणे आज डाॅक्टर, पोलीस, आरोग्यसेवक, ग्रामसमिती अशा ५० लोकांच्या ६ टीम करण्यात आल्या. या टीमने बिदाल परिसरात असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे कुटुंब तसेच आजूबाजूचा परिसर या ठिकाणी भेटी दिल्या. अनेक ठिकाणचे लोक माहिती लपवत होते तर काही लोक एकाच घरात राहत होते. त्यानंतर या पथकाने अशा लोकांना समजावून सांगितले. गैरसोय असणाऱ्या २५ पेक्षा जास्त लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी विलगीकरणात पाठवले. बिदाल परिसर हा वाड्या-वस्त्यात विखुरला असल्याने ६ टीमच्या माध्यमातून एकाचवेळी विलगीकरण केले. तसेच ज्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह असेल अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. बिदालमधील कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत तोडायचीच, यासाठी संपूर्ण यंत्रणेने आज बिदाल परिसर पिंजून काढला तर रुग्णांची अवस्था पाहून योग्य त्या ठिकाणी हलविण्यात आले.
(चौकट..)
बाधितांच्या कुटुंबीयांची सर्व्हे करण्याचा निर्णय...
विलगीकरणाच्या ठिकाणी ऑक्सिजन मशीनची सुविधा दिली. या पुढील ऑक्सिजन म्हणून लोकवर्गणीतून जवळपास ५०० तपासणी किट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण गावातील पॉझिटिव्ह लोकांची कुटुंबे तसेच थंडी, ताप, खोकला येत असलेल्या लोकांचा सर्व्हे करून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१६बिदाल
फोटो--१) बिदाल येथे विलगीकरणासाठी पथकाद्वारे रुग्णांना कक्षात घेऊन जात आहेत.