लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोबाईल असा ७६ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील साहिल भरत जाधव (वय २०) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. त्याने सोमवारी (दि. ११) ही कारवाई केली.
शिरवळ येथील लॉकीम फाट्याजवळ दोघेजण पिस्तुलाची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार गर्जे यांना तेथे सापळा रचण्यास सांगितले होते. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून दोघजण लॉकीम फाट्याजवळ आले. त्यावेळी पथकाने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे व दोन मोबाईल आढळून आले. त्यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह सहायक फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार कांतीलाल नवघणे, आतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, विक्रम पिसाळ, केतन शिंदे, संजय जाधव, विजय सावंत हे या कारवाईत सहभागी झाले होते.
दरम्यान, या घटनेची फिर्याद हवालदार सचिन ससाणे यांनी शिरवळ पोलीस ठाण्याला दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे पुढील तपास करीत आहेत.
फोटो दि. १२सातारा एलसीबी फोटो...
फोटो ओळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथे स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्याला पकडले. (छाया : मुराद पटेल)
..........................................................