कऱ्हाड : वाघेरीतील युवकाला गावठी कट्टा पुरविणाऱ्या परप्रांतीय संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. कबातुल फरोज शेख (सध्या रा. वाघेरी, मूळ रा. झारखंड) असे त्याचे नाव आहे. कबातुलने तालुक्यातील अन्य काही वाळू ठेकेदारांना गावठी कट्टे पुरविल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस त्याच्याकडे तपास करीत आहेत. शहरातील पालिका इमारतीनजीक शॉपिंग सेंटर परिसरात गुरूवारी सायंकाळी गावठी कट्ट्यासह इरफान नजरूद्दीन पटेल (रा. वाघेरी, ता. कऱ्हाड) या युवकाला पोलिसांनी अटक केली होती. वाघेरी येथील इरफान पटेल हा गुरूवारी सायंकाळी गावठी कट्टा घेऊन शहरातील पालिकेनजीक येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी सापळा रचला. इरफान पटेल हा अन्य काही युवकांसोबत पालिकेनजीक बोलत थांबला असताना पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली. त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य चार युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, संबंधित युवकांचा गावठी कट्ट्याशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. दरम्यान, इरफान पटेल याच्याकडे पोलिसांनी गावठी कट्ट्याबाबत कसून तपास केला. त्यावेळी संबंधित गावठी कट्टा हा वाघेरीत वास्तव्यास असणाऱ्या कबातुल शेख याच्याकडून घेतल्याचे इरफानने पोलिसांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पोलिसांनी कबातुल शेख याला ताब्यात घेऊन अटक केली. कबातुल हा मूळचा झारखंडचा रहिवासी असून तो वाघेरीत एका वाळू ठेक्यावर कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने तालुक्यातील अन्य काही वाळू व्यावसायिकांना शस्त्रे पुरविली असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे तपास करीत आहेत.
गावठी कट्ट्याची तस्करी करणाऱ्यास अटक
By admin | Published: September 05, 2015 11:24 PM