चाफळ : विभागातील वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्यास वनविभागाने अटक केली. संजय रामचंद्र महिपाल (वय ५५, रा. वाघजाईवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ लगत खासगी मालकी क्षेत्रात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याने वन कर्मचारी व ग्रामस्थांनी जागेवर जाऊन तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. वाघजाईवाडी येथील संजय महिपाल याने त्याच्या शेतीचा बांध जाळताना सुटलेल्या वाऱ्यामुळे आग नियंत्रणात न आल्याने वणवा भडकल्याचे वनाधिकाऱ्यांना दिसून आले.
महिपाल यांच्या निष्काळजीपणामुळे वनक्षेत्रात वणवा गेल्याने त्याला वनविभागाने तात्काळ अटक करीत त्याच्याविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब व क अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला. वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल एस. बी. भाट, वनरक्षक विलास वाघमारे व वनमजुर यांनी ही कारवाई केली.