अक्षय सोनटक्केपरळी : परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. तरीही पुणे, मुंबई या बाधित भागातून गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. गणेशोत्सवात गर्दी वाढल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच येणाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी दहा दिवस की चौदा दिवस, याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.गणेशोत्सवासाठी गावाला येण्याचा चाकरमान्यांचा निर्धार कायम आहे. काही ई-पास घेऊन दाखलही झाले आहेत. चौदा दिवसांचे विलगीकरण गृहीत धरून त्यानंतर गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेण्याच्यादृष्टीने जुलैपासूनच काही मुंबई-पुणेकर भागात दाखल झाले आहेत. बाकीचे ई-पासची प्रतीक्षा करीत आहेत. काहींच्या ई-पासला विलंब होऊ लागल्याने त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांना चौदा दिवसांचे संस्थात्मक तसेच घरी विलगीकरण करण्यात येईल, तर लक्षणे नसणाऱ्यांचे थेट घरी चौदा दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे. तरीही नक्की किती दिवसांचे होम क्वारंटाईन होणार याचा मेळ लागत नाही.
या सगळ्या गदारोळात चाकरमानी गावातही दाखल होऊ लागल्याने ग्रामस्थांची भीती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढणार, या भयाने काही गावांनी चाकमान्यांनी चौदा दिवस विलगीकरणाचा नियम पाळलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. चाकरमान्यांना ई पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. वेळेत पास मिळत नसल्याने त्यांच्याही मनात धाकधूक आहे.ई-पासचा होतोय विलंबकोरोनामुळे जिल्ह्यात दाखल होण्यासाठी ई-पासची सोय केली आहे. परंतु साताऱ्यातील इ-पास मिळण्यासाठी विलंब होत आहे. तर काहीवेळेला मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना ई-पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. काहीवेळेला सातारा पास मिळत नसल्याने सांगली, कोल्हापूर नावाने पास जनरेट करुन सातारा जिल्ह्यात दाखल होत आहेत.