लोणंद (सातारा): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे साताऱ्यात जिल्ह्यात आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीच्या पात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. निरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे रवाना होणार असून आज व उद्या दोन दिवस पालखीचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे. माऊलींच्या पादुका स्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी निरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माऊली.. माऊलीचा अखंड जयघोष करण्यात आला.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. या सोहळ्याची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाला असल्याने यावर्षी भाविकांमध्ये उत्साह आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. पालखी सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी पोलीस, आरोग्य, नगरपंचायतीचे कर्मचारी, महावितरण व बांधकाम विभागाचे कर्मचारी सज्ज झाले आहेत.दत्त घाटावर स्नानानंतर पाडेगाव हद्दीत जिल्हा परिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी चारपर्यंत पालखी सोहळा लोणंदच्या पालखीस्थळावर स्थिरावणार आहे. लोणंदनगरीमध्ये सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली आहे.
video संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, निरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 2:15 PM