सातारा : जत्रा आणि लग्नसराईचा मुहूर्त तोंडावर आला असून, जिल्ह्यात नारळाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. विशेष म्हणजे तमिळनाडू राज्यातून नारळांची आवक होत असून, सातारा मार्केट यार्डात आठवड्याला तब्बल ७५ हजार नारळ आणले जात आहेत. नोटाबंदीचा परिणाम या व्यवसायावर झाला असल्याने दोन महिन्यांपासून नारळाचे दरही स्थिर आहेत.ज्याप्रमाणे चहापानाशिवाय पाहुण्यांचा पाहुणचार पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे नारळाशिवाय स्वागत, मानपानाचा कार्यक्रमही पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे नारळाला शुभकार्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. नारळाचा उपयोग हा प्रामुख्याने खाद्यप्रदार्थ बनविण्याबरोबरच मानपानासाठी केला जातो. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, जत्रा, लग्नसराईत तर नारळाला प्रचंड मागणी असते. या काळात नारळाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात नारळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाराशे रुपये प्रति शेकडा या दरावरून नारळ थेट आठशे रुपयांवर आला. आवकही कमी आणि मागणीही कमी असे चित्र नोटाबंदीमुळे निर्माण झाले होते. मात्र, सध्या लग्नसराई व जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने नारळाला मागणी वाढत चालली असून, याचे दरही स्थिरावले आहेत.सातारा जिल्ह्यात सध्या तमिळनाडू राज्यातून नारळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नारळाचे आठवड्याला तीन तर महिन्याकाठी १२ ट्रक तमिळनाडूहून साताऱ्यात येत आहेत. सध्या अकराशे रुपये प्रति शेकडा असा दर असून, जिल्ह्यात विविध ठिकाणांहून नारळाला मागणी होत आहे. आगामी काळात आवक वाढणार आहे. तसेच नारळालाही मागणी राहणार आहे. (प्रतिनिधी)एका महिन्यात तीन लाख नारळ... सातारा येथील मार्केट यार्डात आठवड्याला तीन तर महिन्याला १२ ते १३ ट्रक नारळ दाखल होत आहेत. एका ट्रकात सुमारे २५ हजार इतके नारळ असतात. म्हणजेच महिन्याला सरासरी तीन लाख नारळांची विक्री एका सातारा शहरातून होत आहे.
तमिळनाडूतील ‘श्रीफळां’चे जिल्ह्यात आगमन
By admin | Published: March 14, 2017 10:52 PM