पेट्री : कास पठारावर व पठार परिसरात वन्य पशुपक्ष्यांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीकडून यापूर्वी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्याच्या कुंडीत दररोज नियमितपणे वेळच्या वेळी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हे कृत्रिम पाणवठे इथून पुढील येणाऱ्या तीव्र उन्हाळ्यात वन्य पशुपक्ष्यांसाठी जलसंजीवनी ठरणार आहेत.
सातारा-बामणोली मार्गावर आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर व आसपासच्या परिसरात वन्य पशुपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठ्याच्या कुंड्या गेल्या तीन-चार वर्षांपासून कास पठार कार्यकारी समितीकडून ठेवण्यात आल्या आहेत.
आताच कोठे उन्हाळा सुरू झाला आहे. इथून पुढे पाण्याचा प्रश्न भेडसावते. तसेच वातावरणात उन्हाची तीव्रता पाहता झऱ्याचे पाणीही काही अंशी कमी कमी होत असते. कास पठार व आसपासच्या परिसरातील बिबट्या, अस्वले, साळींदर, रानडुक्कर, ससे, भेकर, सायाळ, खवल्या मांजर, सांबर, रान कुत्री, रानगवे, वानर, माकड, पिसोरी सारख्या अनेक पशु, उभयचर प्राणी तसेच पक्षी, कीटक, फुलपाखरे यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी काही दिवसच पुरू शकेल, अशी परिस्थिती आहे. कास तलाव वगळता अन्यत्र पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांची उणीव भासू नये तसेच पाण्याअभावी त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, या कारणास्तव कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाद्वारे यापूर्वी अंधारी परिसर, धावली परिसर, वांजळवाडी, कुसुंबीमुरा, आटाळी, घाटाईफाटा, कास पठार, एकीव तसेच बामणोली बाजूकडील परिसर, कास तलावाच्या पलीकडील परिसरात यापूर्वी ठेवण्यात आलेल्या साधारण छत्तीस कृत्रिम पाणवठ्यात नित्यनियमित वेळच्या वेळी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे या पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांची तहान भागण्यास मदत होत आहे.
(कोट)
जंगलातील प्राणी, पक्ष्यांसाठी कास पठारावर आणि आजूबाजूच्या परिसरात कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून ३६ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यात समितीच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या एक-दीड महिन्यापासून नियमित पाणी सोडले जात आहे.
-योगेश काळे, कास पठार कर्मचारी
(चौकट)
परिसरामध्ये ३६ कृत्रिम पाणवठे...
जंगलातील प्राणी, पक्षी यासाठी कास पठारावर आणि आजूबाजूच्या परिसरात कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून ३६ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. उन्हाळा सुरू होऊन पुढील काळात पाणी टंचाई भासूू नये, यासाठी कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडले जात आहे. तत्पूर्वी या कृत्रिम पाणवठ्याच्या साफसफाईचे काम समितीच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. यामुळे वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबण्यास मदत होत आहे.
फोटो आहे..
१५पेट्री
वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीकडून यापूर्वी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्याच्या कुंडीत दररोज नियमितपणे वेळच्या वेळी पाणी सोडले जात आहे.