सातारा : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत तब्बल १६ पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. यातील फक्त सत्ताधारी तीन पक्षाच्या उमेदवारांनाच विजयाचा गुलाल लागला. त्यामुळे निवडणुकीत विराेधकांची डाळ शिजलीच नाही. तर निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघात वंचित आणि रासपचे उमेदवार होते. तर बसपाने ७ ठिकाणी नशीब अजमावले.
विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याचे निकालही समोर आलेले आहेत. तसेच या निवडणुकीत अपक्ष उतरले होते. तसेच विविध राजकीय पक्षांचे ही उमेदवार होते. प्रमुख राजकीय पक्षात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वाधिक पाच मतदारसंघात उमेदवार उभे होते. यानंतर भाजपचे चार ठिकाणी तर शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे प्रत्येकी दोन मतदारसंघात, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ही दोन तर राष्ट्रीय काॅंग्रेसचा उमेदवार एक मतदारसंघात होता. तसेच इतर छोट्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दंड थोपटलेले. मात्र, सध्याच्या सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांनाच गुलाल लागला आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताच्या फरकाने विरोधकांचा पराभव केला. यामध्ये छोट्या राजकीय पक्षाचे अस्तित्व ही जाणवले नाही. त्यामुळे छोट्या पक्षातील जवळपास सर्वच उमेदवरांची अनामत रक्कमही जप्त झालेली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, उद्धवसेना आणि राष्ट्रीय काॅंग्रेस वगळता इतर छोट्या राजकीय पक्षांच्या बहुतांशी उमेदवारांना चार अंकात ही मते मिळवता आली नाहीत. त्यामुळे या राजकीय पक्षांचा पुरता सुपडासाफ झालेला आहे. काही ठिकाणी तर राजकीय पक्षांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाल्याचे आकडेवारीवरून समोर आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला झाला. महाविकास आघाडीला सर्वच ठिकाणी पराभवाचे तोंड पाहावे लागले. तसेच वंचित बहुजन आघाडी, रासप, बसपासह छोट्या पक्षांचा ही दारुण पराभव झालेला आहे.