सातारा : जिल्ह्यात दुष्काळ छाया गडद असून यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होईना असे स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात टंचाईचे तसेच शेती पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्यस्थितीत पश्चिमेकडील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडीसह मोठे सहा प्रकल्प भरण्यासाठी २८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर या प्रमुख धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी आहे.जिल्ह्यात चार-पाच वर्षांतून दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये दुष्काळाने लोकांना हैराण करुन सोडले होते. चार लाखांवर लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. तसेच माण, खटाव तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, सप्टेंबर महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व भागातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे.तर दुसरीकडे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी धरणे अजून भरलेली नाहीत. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्येही पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे भरणार का याविषयी साशंकता आहे. कारण, बलकवडीसारखे धरण काठावर असलेतरी इतर धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. या धरणात सध्या १२१.६७ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर गतवर्षी या धरणात १४१.१९ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यावेळी पाऊस सुरुच असल्याने धरणांतून विसर्ग सुरू होता. तसेच ही धरणे ९५ टक्क्यांपर्यंत भरलेली.मात्र, यावर्षी उलट स्थिती झालेली आहे. त्यातच या धरणक्षेत्रात पावसाची तूट मोठी आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा १४१८ मिलीमीटर पाऊस कमी झालेला आहे. मागीलवर्षी ३० आॅगस्टपर्यंत या प्रमुख सहा धरणक्षेत्रात तब्बल ९ हजार ४९६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा ८ हजार ७८ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यातल्या त्यात तारळी, बलकवडी धरणाची स्थिती चांगली आहे. पण, कोयना आणि उरमोडी भरण्यासाठी सतत आणि मोठ्या पावसाची गरज आहे.
सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी, जाणून घ्या प्रमुख धरणातील पाणीसाठा
By नितीन काळेल | Published: August 31, 2023 1:24 PM