सातारा : जिल्ह्याला मान्सूनच्या पावसाने दगा दिला असून पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के बरसला आहे. त्यामुळे यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून दुष्काळी भागात तर पाझर तलाव, ओढे कोरडे असल्याने चिंताजनक स्थिती आहे.जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरला. कारण, जूनपासून सप्प्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला आहे. फक्त जुलै महिन्यात चांगले पर्जन्यमान झालेले. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडझाप राहिली. त्यातच आतातर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने यापुढे चांगला पाऊस होईल ही आशा मावळली आहे. तर पावसाळच्या चार महिन्यात फक्त ६५.०४ टक्केच पाऊस झालेला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. याचाच अर्थ तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद आहे. १०० टक्के पाऊस कोणत्याही तालुक्यात झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.
पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती
By नितीन काळेल | Published: October 02, 2023 7:00 PM