सातारा : मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. या आंदोलनात शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात कल्याणी मराठे, राणी कुंभार, संगिता बाजारे, सीमा भोसले, रेखा क्षीरसागर, रुपाली पवार, चित्रा झिरपे, वैशाली भोसले, स्वाती देसाई, सुवर्णा पाटील, जयश्री काळभोर यांच्यासह शेकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या शासनदरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत विचार करण्यात आलेला नाही. तर गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर १२ जानेवारी असे मिळून दोन संप पुकारण्यात आले. तरीही मागण्यांबाबत नुसतीच आश्वासनेच मिळाली. यापुढे मागण्यांबाबत बैठक न घेता मानधन वाढ करावी.आशांना ७ हजार तर गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव मान्य करावा, दिव्यांग बांधवांच्या सर्व्हेचा मोबदलाही लवकर देण्यात यावा, संप काळात कपात केलेले मानधन द्यावे, आॅक्टोबर ते डिसेंबरचा वाढीव मोबदला कपात न करता त्वरित वितरित करावा तसेच कपात केलेले मानधन कोणत्या सूचनेनुसार करण्यात आले याचाही खुलासा करावा, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे याच दिवशी महाराष्ट्रातील ६० हजार आशा आणि गटप्रवर्तक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर वाढीव मानधनाचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार आहेत. यासाठी सातारा जिल्ह्यातून गुरुवारी सायंकाळी महिला कर्मचारी जाणार आहेत, अशी माहिती काॅ. माणिक अवघडे यांनी दिली.