क-हाड : कोरोनाविरुद्धच्या लढाईत अविश्रांतपणे लढणाऱ्या ‘आशा’ सेविकांचेच आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल कºहाड येथील रोटरी क्लबने घेत नांदगाव, नवीन नांदगाव व पवारवाडी या तीन गावातील आशा सेविकांना फेस शिल्डचे वितरण केले. याबरोबरच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीची औषधेही दिली. ही दखल घेतल्याने आशा सेविकांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी २००९ मध्ये ‘आशा सेविका’ ही संकल्पना आरोग्य विभागाने सुरू केली. गर्भवती माता व दीड वर्षापर्यंतच्या लहान बालकांची काळजी घेणे, लसीकरण वेळेत करून घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी; पण याबरोबरच कुटुंब नियोजनाबाबत प्रबोधन करणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणे, टीबी, कुष्ठरोग यासारख्या आजाराचे सर्वेक्षण करणे, साथीच्या रोगांचे सर्वेक्षण करणे आदी जबाबदाºया बरोबर कोरोना सर्वेक्षणची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे.
म्हासोलीतील आशा सेविका कोरोना बाधित सापडल्याने आशा सेविकांचा धोका समोर आला आहे. त्यामुळे इतर आशा सेविकांच्या सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून नुकतेच रोटरी क्लबच्यावतीने नांदगाव, नवीन नांदगाव व पवारवाडी येथील आशा सेविकांना फेस शिल्डचे वाटप केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष जगदीश वाघ, सचिव राजीव खलिपे, सदस्य गजानन माने, डॉ. शेखर कोगनुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. वि. तु. सुकरे गुरूजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आशा सेविकांना सन्मान पत्र..!याच कार्यक्रमात वि. तु. सुकरे गुरुजी यांच्यावतीने आशा सेविक अनिता पाटील, रूपाली कुचेकर, वैशाली कांबळे, आरती पवार यांना हँड सॅनिटायझर, मास्क आदी साहित्यांबरोबर उचित गौरव करणारे सन्मानपत्र देण्यात आले. आपल्या कार्याची दखल घेतल्याचे पाहून आशा सेविकांचे डोळे पाणावले होते.