खंडाळा : कोरोनाने खंडाळा तालुक्यात थैमान घातले आहे, अशा परिस्थितीत कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आशा सेविका गावोगावी काम करीत आहेत. याकामी त्यांचे योगदान अनमोल आहे. तरीही त्यांच्याबाबत सोशल मीडियावर वैयक्तिक पातळीवर मानहानीकारक मजकूर टाकून बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ खंडाळा तालुक्यातील आशा सेविकांनी काम बंदचा निर्धार करून निषेध व्यक्त केला.
याबाबत तालुक्यातील सर्व आशा सेविकांनी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व गावात व वाडीवस्तीवर प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कोरोनाविषयी जनजागृती करणे, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वेक्षण करणे, कोमॉर्बिड लोकांची स्वतंत्र यादी बनविणे, कोरोना पेशंटचे ट्रेसिंग करणे ही सगळी कामे गेल्या दीड वर्षापासून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे करीत आहोत. तरीही सोशल मीडियावर काही समाजकंटक अश्लील टिपण्णी करुन बदनामी करीत आहेत. अशी बाब करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत गावपातळीवरील सर्व कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
कोट :
खंडाळा तालुक्यातील आशा सेविकांचे कोरोना काळात योगदान महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर घडलेल्या घटनेचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. याबाबतचे त्यांचे म्हणणे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले आहे. याची चौकशी होऊन त्यांना न्याय देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.
- डॉ . अविनाश पाटील,
तालुका वैद्यकीय अधिकारी, खंडाळा
............................................