लोणंद (सातारा) : 'पंढरीचा वास चंद्रभागे स्रान, आणिक दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे...' ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी लोणंदमध्ये पोहोचले. नभांगणी फडकणा-या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष अन् देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा, अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरा तीरावर शुक्रवारी दुपारी उत्साहात स्वागत झाले.
माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पालखीचे आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्रान घालण्यात आले.
माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव, ता. खंडाळा येथे पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन थाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, सदस्या दीपाली साळुंखे, उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दीपा बापट, सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, पुरुषोत्तम जाधव, राहुल घाडगे, संभाजी घाडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.