अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, नाना पटोलेंचा घणाघात 

By नितीन काळेल | Published: February 24, 2024 03:35 PM2024-02-24T15:35:59+5:302024-02-24T15:37:38+5:30

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ जागा महाविकास आघाडी जिंकण्याचा कल 

Ashok Chavan brought the Congress MP to one place, Criticism of Congress State President Nana Patole | अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, नाना पटोलेंचा घणाघात 

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, नाना पटोलेंचा घणाघात 

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला, असा घणाघातही केला.

सातारा जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, धनश्री महाडिक, अॅड. विजयराव कणसे, प्रा. विश्वंभर बाबर, संदीप माने, जगन्नाथ कुंभार आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘राज्यातील मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली २०१४ पासून देवेंद्र फडणवीस फसवत आहेत. भाजपकडून आरक्षणाचा बागुलबुवा केला जात आहे. मराठा आणि ओबीसीत वादाचे बीज भाजपनेच रोवले. आता ते शिखरावर गेले आहे. भाजपमुळेच आरक्षणाला मुठमाती मिळालेली आहे. आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा नुसता गवगवा केला जातोय. यातूनही भाजपने फसविण्याचेच काम केले असून मनोज जरांगे-पाटील आणि समऱ्थकांतही वाद लावला जात आहे.

भाजपकडून आरक्षणमुक्त भारतचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही जातगणना करायला तयार नाहीत, असे सांगून प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही. दिल्लीजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना गोळ्या घालून मारले जात आहे. केंद्र शासनाने केलेले कायदे हे लोकशाही संपष्टात आणण्यासाठीच केले आहेत. पण, देशात आता इंडिया आघाडीचेच सरकार येणार आहे.

गॅरंटी शब्द आमचा; त्यांची गॅरंटी संपलीय..

भाजप गॅरंटी शब्द वापरत आहे. पण, हा शब्द आमचा असून त्यांनी चोरला आहे. या गॅरंटीला त्यांनी अपमानीत केले आहे. त्यांची गॅरंटी आता संपली आहे, असा टोला पटोले यांनी भाजपला लगावला. तसेच धर्म, जातीच्या नावावर राजकारणाचा एक अजेंडा वापरण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

माझ्यावर आरोप स्वाभाविक..

पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्याबद्दल आणि त्यांचा रोख आपल्याकडे असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर पटोले यांनी मी मंत्री नव्हतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करणे स्वाभाविक आहे. पण, ते आयुष्यभर काँग्रेसबरोबर राहिले. पण, पक्षाचा खासदार त्यांनी एकवर आणून ठेवला, असे ठामपणे सांगितले.

Web Title: Ashok Chavan brought the Congress MP to one place, Criticism of Congress State President Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.