सातारा : ‘मुख्यमंत्री असताना शरद पवारांनीच पाणी वाटपाच्या अनुशेषाचं भूत राज्याच्या मानगुटीवर बसविलं होतं. जिल्ह्यातील खटाव-माण तालुक्यांत दुष्काळाची विदारक स्थिती त्यांच्या धोरणामुळेच झाली आहे,’ असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘महाराष्ट्राचे नेते म्हणवून घेणारे गेलेत कुठे? त्यांना जमेना म्हणून शरद पवारांना उतारवयात दुष्काळी भागाचे दौरे करावे लागत आहेत,’ अशी खरमरीत टीकाही त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. येळगावकर म्हणाले, ‘राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोन्ही पक्ष सत्तेवर असताना त्यांना जिल्ह्यातील दुष्काळी प्रश्न सुटला नाही. आता काही तरी करतो, हे दाखवायचं म्हणून हे दोन्ही पक्ष सरकारविरोधात मोर्चे काढत आहेत. उरमोडी धरणात सात ते आठ टीएमसी पाणी असूनही दुष्काळी स्थिती कायम आहे. या धरणातून सातारा, माण, खटाव तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आणण्याचे मुख्य उद्दिष्ट होते; मात्र अद्याप ते साध्य झालेले नाही. या योजनेतील मुख्य कालव्याची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दोन्ही काँगे्रस केवळ मोर्चाचं नाटक करीत आहेत.’ - आणखी वृत्त /२
अनुशेषाचं भूत पवारांनीच आणलं : येळगावकर
By admin | Published: August 31, 2015 11:28 PM