सातारा : सध्या चिनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने ८५० हून अधिक चिनी नागरिकांचा बळी घेतला असतानाच साताऱ्यातील अश्विनी अविनाश पाटील या चीनमधील वुहान शहरात अडकल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.आश्विनी पाटील या आठ महिन्यांपूर्वी पतीसोबत चीनला निघून गेल्या. चीनमध्ये ज्या ठिकाणी साताऱ्याच्या आश्विनी पाटील राहात आहेत. त्या ठिकाणी दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्या कशापद्धतीने राहत आहेत.
याची माहितीही त्यांनी या व्हिडीओद्वारे दिली आहे. त्यांनी मायदेशी परत येण्यासाठी भारत सरकारला विनंती केली आहे. त्यांचा पासपोर्ट चीनच्या सरकारी यंत्रणेत अडकल्यामुळे त्यांना मायदेशी परत येण्यसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारला आपल्या चीनमधल्या राहत्या घरातूनच मायदेशी परत घेऊन जाण्यासाठी याचना केली आहे.भारत सरकार त्यांच्या आव्हानाला कशा पद्धतीने प्रतिसाद देते, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या कुटुंबीयाकडूनही अश्विनी यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे पती भारतीय नागरिक नाहीत.
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्यानंतर तेथील शासनाने आपापल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र, अश्विनी पाटील यांना तेथील सरकारने कोठेही नेले नसल्याचे अश्विनी यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे.