सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण साखळी उपाषणाच्या पाचव्या दिवशी शेकडो आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. यावेळी राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा मुंबईला विधीमंडळात जावे, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, सातारा शहरातून शेकडो आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली.आमरण उपोषणादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली तरी सरकार दखल घेत नसल्याने राज्यभर मराठा आंदोलनाचा भडका उडाला आहे. सातारा जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी शेकडो आंदोलकांनी आंदोलन केले. आजच्या साखळी उपोषणात जिहे, बोरखळ, पाटखळ, आरळे यासह परळी भागातील सर्व गावांमधील मराठा बांधव सहभागी झाले होते. जास्त संख्येने गावे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गर्दीने फुलून गेला. शहरातून शेकडो युवकांनी काढलेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर गर्दीत आणखी भर पडली.आंदोलनात कधी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, ओव्या म्हटल्या जात होत्या. तर कधी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. एका आंदोलकांने 'गर्जा महाराष्ट्र माझा' आणि शूर आम्ही सरदार हे गीते गायली. यामुळे आंदोलकांना स्फुरण चढले. सर्वांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली तर कुणी भगवा ध्वज गरागर फिरवला. दुपारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांनी आरक्षणासाठी विधीमंडळात विशेष अधिवेशन बोलावावे व मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, असे आवाहन केले. यावेळी मराठा समाज बांधव म्हणून याठिकाणी आलो आहे. कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण समाजाला मिळावे, असे मत व्यक्त करून आरक्षण मिळण्यासाठी जे करता येईल, ते करणार असल्याचे सांगितले.तुमच्यासारखे किती आले फिरंगे..उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे!आंदोलकांनी वेगवेगळ्या घोषणा देताना नेत्यांवर चौफेर हल्ला केला. सदा.. बंद कर तुझी वळवळ, मराठ्यांची उभी राहिलीय चळवळ!, मराठ्यांच्या विरोधात बसली जरी टोळी.. आमचेच बांधव देतील तुम्हाला साडी अन् चोळी!, तुमच्यासारखे किती आले फिरंगे.. उपोषणाला बसलाय भाऊ आमचा जरांगे!, ओ नारायणराव.. तुमच्या बाता झाल्या छोट्या.. मराठ्यांच्या घरामध्ये तलवारी आहेत मोठ्या! अशा घोषणांनी लक्ष वेधले.
आंदोलकांच्या मंडपात येण्यापेक्षा विधीमंडळात आरक्षण मागा, मराठा आंदोलकांचे सर्व राजकीय नेत्यांना आवाहन
By दीपक देशमुख | Published: October 31, 2023 4:01 PM