सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणाल्याच्या कारणावरून देवेंद्र चंद्रकांत राजेमहाडिक (वय ४९, रा. दौलतनगर, अलंकार कॉलनी, सातारा) यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित विजय कुंभार (रा. करंजे पेठ, कुंभारवाडा सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यातील संशयिताने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घे, असे देवेंद्र राजेमहाडिक म्हटल्याच्या कारणावरून चिडून जाऊन रोहित कुंभार याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. यामध्ये राजेमहाडिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रोहित कुंभार याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.