कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाला गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनपद्धती, एकाच छताखाली उपलब्ध असलेली उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल नुकतेच ‘आयएसओ ९००१:२००८’ मानांकन प्राप्त झाले आहे. देशात काही विद्यापीठांनाच प्राप्त झालेले ‘आयएसओ ९००१:२००८’ मानांकन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठासह संलग्न असणारा वैद्यकीय विज्ञान अधिविभाग, दंतविज्ञान अधिविभाग, परिचारिका विज्ञान अधिविभाग, फिजिओथेरपी अधिविभाग आणि अलाईड सायन्स अधिविभागालाही प्राप्त झाल्याने विद्यापीठाच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे. २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. जयवंतराव भोसले हेविद्यापीठाचे प्रथम कुलपती झाले. डॉ. सुरेश भोसले यांची प्रथम कुलगुरूपदी निवड करण्यात आली. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही कृष्णा अभिमत विद्यापीठाचा नावलौकिक पोहोचविला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिवंगत जयवंतराव भोसले यांचा वारसा समर्थपणे जोपासला असून, त्यांनी विद्यापीठाचा विस्तारच केला नाही, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाला गुणवत्ता, नावीन्यता व उत्कृष्ठता यासाठी ओळखले जात आहे. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या उच्च गुणवत्ताप्राप्त आरोग्य सोयी सुविधांमुळेच आज विद्यापीठाला हे मानांकन प्राप्त झाले. रक्तपेढीला ‘एनएबीएच’ या राष्ट्रीय संस्थेचे मानांकन लाभले असून, कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रोगनिदान प्रोगशाळेला लवकरच ‘एनएबीएल’ या राष्ट्रीय संस्थेकडून मानांकन मिळण्याची शक्यता आहे. गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण व रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी असलेल्या विद्यापीठाच्या कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्रालाही ‘एनएबीएच’चे मानांकन मिळविण्यासाठी तयारी सुरू आहे. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाला मिळालेले मानांकन हे विद्यापीठाला उत्कृष्ट कामगिरीसाठी लाभदायक ठरेल, असे डॉ. नाडकर्णी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
‘कृष्णा विद्यापीठाला ‘आएसओ’ मानांकन
By admin | Published: March 19, 2015 9:36 PM