कातरखटाव : मायणी - दहिवडी राज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने ‘खड्डा चुकवून दाखवाच,’ असे वारंवार खुले आवाहन केले होते. त्यामुळे कोणता खड्डा चुकवायचा आणि कोणता नाही, अशी वाहनधारकांची परवड झाली होती. या वृत्तामुळे झोपलेल्या संबंधित खात्याला खडबडून जाग आली. यामुळे अखेर या रस्त्याला डांबर लागले आहे.
गेले आठ दिवस झाले या राज्य महामार्गाचे साडेतेरा किलोमीटर अंतराचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या खड्डेमय रस्त्याकडे संबंधित खात्याचे चांगलेच दुर्लक्ष झाले होते. या रस्त्याने उन्हाळे, पावसाळे पचवल्यामुळे रस्त्याची पुरती वाट लागली होती. अनेक छोटे-मोठे अपघातही होत होते. वाहनधारकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते.
अनेक वर्षांपासून साईडपट्ट्या खचल्यामुळे व मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या मार्गावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन कसरतीचा प्रवास करावा लागत होता. कातरखटावसह तडवळे, बोंबाळे, बनपुरी, सूर्याचीवाडीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. चारचाकी वाहन असो किंवा दुचाकी या मार्गावर वाहनाबरोबर मणक्याचा खुळखुळा होत असल्याने साईडपट्ट्यांचा मार्ग शोधावा लागत होता. त्यामुळे संबंधित खात्याने या वृत्ताची दखल घेऊन साडेतेरा किलोमीटर महामार्गाचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरु केले आहे.
कोट
खड्डे पडले... जबाबदारी आमची...
तडवळे ते सूर्याचीवाडी हा तेरा किलोमीटर अंतराचा रस्ता काँक्रिट, डांबरीकरण रस्ता तयार करत आहोत. हे राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. जिथे खड्डे पडले, साईडपट्ट्या खचल्या आहेत, अशाठिकाणी दुरुस्ती करून पावसाचे पाणी रस्त्यावर न येता नाल्यात सोडले जाते. अशातऱ्हेने एक वर्ष कालावधीमध्ये कंपनी देखभाल करणार तसेच खड्डे पडले तर दुरुस्त करून देणार आहे.
- नितीन साळवे,
प्रकल्प अधिकारी